ग़ज़ल आणि कविता

गरगर गरगर... गरगर गरगर ....
----------------------------------
गरगर गरगर... गरगर गरगर ....
धावतोय न आपण..?
एकमेकांमागे ... लॉजिक विसरून...
फॅनच्या तीन पात्यांसारखे....

जीवघेण्या स्पर्धेत पुढे कोण..?
तू की मी...?
या एक, दोन, तीन, चार, पाचच्या स्पीडने..?
फरफटत, ओरबाडत, स्वत्वाला तुडवत,
बेहोश वेडात गरगरत....
कधी मनमोकळं भेटणार एकमेकांना सवडीत ..? 
की एकमेकांच्या अजगर मिठीच्या तावडीत..?

धावत्या या २४ तासांच्या जीवनचक्रात,
असंख्य प्रश्नांचे ओझे उरात वागवून,
हृदयाला पिळवटुन, उर फाटेपर्यंत...
पळणार कधी पर्यंत..??
जीव जाळणार कुठपर्यंत..???

एकमेकांना गाठायच्या तीव्र इच्छेने,
पण नेहमीच का हे सतावणारे,  
तुझ्या माझ्यात १४ इन्चांचे फिक्स अंतर..?
इर्ष्येचे, अहंकराचे, फसव्या सुरक्षित कोषातले अंतर..?
की भ्रामक स्वयंप्रेमाच्या मृगाजळाचे अंतर..?
कायमच चिकटून राहणार का..?
हे १४ शतकांच्या दुराव्याचे अंतर..?

...आणि ध्येयाच्या त्या पहिल्या पात्याचे काय?
धारधार तीव्र विकट, जीवघेण्या स्पर्धेचे काय..?
तेच खरे सुख, ध्येय समजुन,
त्यालाच तर कवेत घ्यायला..
जीवाच्या आकांताने निघालो होतो न आपण..?

सुरवातीच्या संसारवेलीच्या कोमल भावना...
आज चालल्यात जळत, गळत...
जीव खाऊन पळताना,
तोंडातून येणा-या फेसाप्रमाणे फेसाळत...
पळतोय पडतोय ठेचकाळत, धडपडत,  
त्याचे भान सुद्धा नसावे आपल्याला..?

षंढासारखे, निर्ढावलेल्या उन्मत्त मस्तीत..
उलट्या हाताने तो गळणारा फेस पुसत
कोणत्या क्षितिजाच्या ओढीने धावतोय...?
की रक्ताळलेल्या पावलांचे ठसे उमटवित,
हृदयाच्या चिंधड्या, लक्तरे उडवित पुन्हा एकदा,
खोल खोल अंधाराच्या कृष्णविवराच्या दिशेने..   
चुंबकाप्रमाणे ओढले जातोय..??

कधी समजणार, उमगणार,
कळणार आणि वळणार.. ?  
स्वार्थी ध्येयाच्या बेगड्या फुटक्या हंडीला,
सोन्याचा हंडा समजुन कवटाळण्यासाठी,
सरड्या सारखे रंग बदलत चिकटण्यासाठी,
उभ्या जन्माचे धिंडवडे काढून, प्रेमाची होळी करून,
कॉर्पोरेट वर्ल्डच्या गलिच्छ, निसरड्या शिखरावर
जो जीवाचा आकांत चाललाय,

तो तर इथेच सोडून जायचाय......

ध्येयरुपी ते पहिले पाते कवेत घ्यायला,
कर्तव्याचे शूद्र काळीज लेवून,       
हिंस्र स्वयंस्फुर्तीचे आवसान आणुन,
एकमेकांच्या कुरघोडीला, हिमालय उडी म्हणुन,
लांडग्याच्या भावनेला, सिंहाची हिम्मत म्हणुन,
खेकड्याच्या पाय खेचण्याच्या वृत्तीला,
यशाच्या चढत्या शिडीची उपमा देऊन,
आयुष्य उधळत तिलांजलि जरी दिली तरी..
तरी..
तरीही...
आपण एकमेकांच्या बरोबर नसणारच.....

आयुष्याचा हा फॅन शेवटचा स्वीच ऑफ़ होईपर्यंत,
धावून धावून स्वत:लाच उध्वस्त करेपर्यंत,
किंवा.. ह्या धावण्याच्या शर्यतीमधली,
लॉजिकल चूक लक्षात येईपर्यंत,
आपण एकमेकांबरोबर नसणारच.....आपण एकमेकांबरोबर नसणारच.......

~जमीर इब्राहिम "आझाद"..
beyond.thinking@gmail.com


======================================================================
 ध्यासपर्व 
- क्रांति

 उंबरा नाही तुझा आला कधी ओलांडता
काळ आला न्यायला, दारात झाला थांबता

मान झुकवुन जी हुजूरी फक्त केली नेहमी,
हक्क नाही जाणले, नाहीच आले भांडता

विस्कटावे लागले धागे पुरे गोफातले
एकदा सुटल्या, पुन्हा गाठी न आल्या बांधता

धाडसाने घातली मीही उडी, पण शेवटी
कोठडी दैवात आली, सप्तसागर लांघता

हरवली स्वप्ने किती अन् फाटली नाती किती?
विखुरले मी एकटी हे शोधता, ते सांधता

केवढी अनमोल होती तू दिलेली आसवे,
शिंपल्यांनी कैद केली पापणीतुन सांडता

एवढा संदिग्ध नव्हता प्रश्न मी केला तुला,
ध्यासपर्वाची कधी होणार आहे सांगता?

क्रांति :

मुळ लिंक:  http://agnisakha.blogspot.com/search/label/%E0%A4%97%E0%A4%9D%E0%A4%B2

MY COMMENTS:-
माझे रसग्रहणः-

उंबरा नाही तुझा आला कधी ओलांडता
काळ आला न्यायला, दारात झाला थांबता

वाह...
कसला जबरदस्त एफ्फेक्ट आहे क्रांतिताई -
काळ दारात आला न्यायला तरी त्याची सुद्धा हिम्मत झाली नाही तो उंबरा ओलांडायची इतका तो करकचून आवळलेला न दिसणारा पाश (की फास) होता..

मान झुकवुन जी हुजूरी फक्त केली नेहमी,
हक्क नाही जाणले, नाहीच आले भांडता

कारण... ???
अबोल, दुस-याच्या अन्यायाला त्यांचा आपल्यासाठीचा नियम असे स्वताला समजावून जगत राहिली...
असमंजसपणे....? की भारतीय नारी (५० वर्षा पूर्वीची..?) असल्याचा सार्थ(?) अभिमान कायम ठेवून ??

विस्कटावे लागले धागे पुरे गोफातले
एकदा सुटल्या, पुन्हा गाठी न आल्या बांधता

वाह.. काय सही उपमा आहे ही...
आयुष्याच्या गोफातले सर्व धागे विस्कटावे लागले..
कारण त्या निर्ढावलेल्या निगरगट्टाप्रमाणे नीरगाठीच इतक्या करकचून बांधलेल्या होत्या की त्या सोडवता सोडवता स्वताचे आयुष्यच पार विस्कटून गेले..
आणि नाती अस्तव्यस्त झाल्यामुळे कुठले टोक कुठे न्यावे, कुठे जोडावे हेच कळेनासे झाले.

धाडसाने घातली मीही उडी, पण शेवटी
कोठडी दैवात आली, सप्तसागर लांघता

..अन अश्या या स्वताच्या फसलेल्या आयुष्यातून, अस्तव्यस्त झालेल्या विस्कटलेल्या नात्यांच्या भोव-यातून दोनच उपाय दिसतात..
हनुमान उडी घेउन हा सप्तसागर लांघणे
किंवा
सुर्याजीने कापलेल्या दोरखंड-लटकत्या आयुष्याच्या दरीत स्वताला सीतेप्रमाणे सामावून घ्यायची इच्छा करणे..
.. पण हनुमानाप्रमाणे डोक्यावर आशीर्वादाचा हात इथे नाही त्यामुळे सप्तसागर लांघताना कोठडीच दैवात आली.. हे किती मोट्ठे दुर्दैव..

हरवली स्वप्ने किती अन् फाटली नाती किती?
विखुरले मी एकटी हे शोधता, ते सांधता

आयुष्य तर वन-वे असल्या प्रमाणे आहे ...
जिचा सरळ मार्गच जर इतका खडतर असेल तर त्या कवितेतल्या नायिकेच्या परतीच्या मार्गाची कल्पनाच करवत नाही...
त्यामुले दुभंगलेल्या, ठिक-या ठिक-या झालेल्या मनाची अवस्था किती भयानक असेल..? आणि तरीसुद्धा तिलाच बिचारी ला एकटीला टाकुन समाज गम्मत बघत बसलाय ..
स्वप्ने तर सगळीच फाटून तुटून कधीच हरवली.... आणि बेगडी, स्वार्थी फोल नाती सांधता सांधता ती स्वताच बिचारी विखरुन गेली..!

केवढी अनमोल होती तू दिलेली आसवे,
शिंपल्यांनी कैद केली पापणीतुन सांडता

- बघा... इतके दुःख सहन करून सुद्धा तिच्या मनातील तरलता आणि हळवेपणा अजिबात कमी होत नाहीये..  उलट त्याला प्रखर धार चढ़त चाललिये..
सगळ्यां उरफाट्या काळजाचे लोक, उध्वस्त नाती, भग्न स्वप्ने आणि उद्विग्न मन घेउन एकटेपणे लढूनसुद्धा तिच्या मनात एक हळुवार कोपरा आहे त्यात जपून ठेवलेले कधीचे काळवंडलेले अधूरे स्वप्न आहे...
आणि ते अनमोल स्वप्न पापणीतुन निसटुन कधी हलकेच सांडले....तर लगेच डोळ्यांच्या शिंपल्यांनी स्वताच्याही नकळत पुन्हा कैद केले...

एवढा संदिग्ध नव्हता प्रश्न मी केला तुला,
ध्यासपर्वाची कधी होणार आहे सांगता?

- कहर.. कुर्निसात.. काय जबरदस्त आहेत या दोन ओळी..!!!!
....सम्पूर्ण कवितेचा 'ताज' आहेत..
जीवनाचे मर्म, आयुष्याचा आरसा, ती स्वत: लढून लढून अगदी तरबेज झालिये ..
जशी काही दुःख मागणारी कुंतीच....!!!
... म्हणुनच तिने विचारलेल्या प्रश्नात तिला ख़ास असे काहीच वाटत नाहीये..
परन्तु...
अनगिनत, अगणित वेळा हा जो जीवनाचा मांडलेला खेळ आहे.. 'ध्यासपर्व' आहे.. तो तर सुरु झालाय... !
त्याचे उत्तर देण्याची हिम्मत कोणात असेल..?
शेवटचा केलेला प्रश्न एवढा संदिग्ध नव्हता तर तो काळीज चिरत जाणारा होता.. !
५८४ पानी कार्ल मार्क्स फेकून द्यावा अणि तुमची ही कविता एनलार्ज करून लावावी असे वाटते आहे.. !
कमीतकमी 5 वेळा वाचली आणि प्रत्येक वेळी नविन वाटली तुमची ही कविता..!!



~जमीर इब्राहिम "आझाद"
19-Dec-2011
************************* 

हिंदू असोत कोणी, कोणी असोत मुस्लीम....
..

वणव्यात पेटलेली, वस्ती अजून बाकी,
जाळून पीळ गेला.... रस्सी अजून बाकी..!

हिंदू असोत कोणी, कोणी असोत मुस्लीम,   
दोस्ती उजाड झाली, बस्ती अजून बाकी..! 

रामो रहीम नाही, जातीयतेत काही,
पण  'राज' कारण्यांची, कुस्ती अजून बाकी..!

सांधावयास सारे, आयुष्य वाहिले मी,
माया जगात का ही, सस्ती अजून बाकी..?

सारे दुभंगलेले, उध्वस्त मोडलेले,
जोडेन मी पुन्हा ते, हस्ती अजून बाकी..!

माणूसकी जपाया, बांधून सर्व जखमा,
हा मी उभा पुन्हा बघ, मस्ती अजून बाकी..!!


----
~जमीर इब्राहिम "आझाद"
15-Dec-2011
*************************