आपण यांना पाहिलंत का ???

साधा माणुस...

मला आठवते कि लहानपणी दुरदर्शन वर  "आपण यांना पाहिलंत का ?" हा पाच मिनिटांचा कार्यक्रम लागायचा..
जो आम्हा मुलांचा खूप म्हणजे खूपच फेवरेट होता ..!!
याचे कारण असे होते कि -  त्यात हरवलेले लोक घरातून पळून जात आणि त्यांचा फोटो दाखवत असत आणि आम्ही मुले -
"अरे याला तर कालच गावात पाहिला..!, 
"याला तर सकाळीच देवळात दर्शन घेताना बघितले.. !" असे उगीच बरळत असु..! 

लहानपणी त्यात गंमतीचा भाग जास्त होता..!!
त्यातील गमतीचा भाग सोडला तर आम्हाला त्या बातमीशी काहीच घेणे देणे नसे ..

हे सगळे आता आठवायचे कारण म्हणजे  वास्तवातील आकडेवारी खूप भयानक चित्र समोर दाखवते.. आणि ते म्हणजे जवळ जवळ रोज ४२ जण बेपत्ता होतात..!

बेपत्ता म्हणजे थोडक्यात 'घरातून न सांगता निघून जाणे' अथवा 'पळून जाणे..'

सध्या आपण किती फास्ट युगात जगत आहोत कि ज्यात डोके ठिकाणावर असलेला किंवा असलेली जर कुणी मोठी व्यक्ती हरवली तर तिला जेणेकरून शोधायला जास्त अडचण येणार नाही,
पण पोलिसांकडील उपलब्ध रेकॉर्ड अनुसार १८ वर्षांवरील जे शहाणे लोक आहेत (म्हणजे जे प्रस्तुत अर्थाने वेडे नाहीत - जे आपण  स्वत: काय करीत आहोत ते जाणतात असे) त्यांची आकडेवारी ८३ हजार ५०० इतकी आहे..! यामध्ये खंडणी किंवा अन्य कारणास्तव अपहरण केलेली मंडळी नाहीत.!!

या ८३ हजार ५०० त सर्वाधिक ८0 टक्के लोक हे स्वत:हून निघून गेलेले आहेत.!!

वरिष्ठ अधिकार्‍यांकडून समोर आलेल्या सरकारी माहिती नुसार याची वेगवेगळी कारणे अशी आहेत:-  
  1. प्रियकर अथवा प्रेयसीबरोबर पळून जाणे (२० टक्के)
  2. समाजातील स्पर्धात्मक वातावरणात न टिकण्याची भीती यामुळे निघून जाणे (सर्वात जास्त प्रमाण  ६० टक्के
  3. घरच्यांच्या त्रासाला वैतागून निघून जाणे, (यात विशेष करून बायकोच्या त्रासाला वैतागून निघून गेलेल्या पुरुषांची संख्या जास्त आहे..!!)
  4. नोकरीसाठी न सांगता निघून जाणे (याचे प्रमाण कमी आहे)


 ही आहे फक्त देशाची आर्थिक राजधानी मुंबईतून हरवल्या जाणार्‍यांची धक्कादायक संख्या. जर संपूर्ण भारताचा विचार केला तर काय आकडेवारी समोर येईल याचा विचारच मनात धडकी भरवतो..!!

गेल्या सात वर्षांत जवळ जवळ ८३ हजार ५०० जण "बेपत्ता" या वर्गात मोडतात त्यापैकी १0 हजार ६०० जणांचा पोलिसांना अद्याप ठावठिकाणा लागलेला नाही... आणि आता शक्यता सुद्धा कमीच दिसते आहे.. कारण यांमध्ये सगळे "आम आदमी" आहेत..

विशेष म्हणजे दर महिन्याला जवळपास ११५0 तर दिवसाला ४२ जण शहरातून गायब होत आहेत....
इतक्या वर्षांत हरवलेल्या व्यक्तींमध्ये जास्त करून १५ ते ३५ वयोगटातील लोक आहेत. त्यात स्त्रियांची संख्या त्यामध्ये फक्त २२ हजार इतकी कमी आहे. !!!

पोलिसांना एकूण सापडलेल्या लोकांची संख्या ७२ हजार ४००. १०५०० हून जास्त अजूनही बेपत्ता आहेत.
सापडलेल्या लोकांमध्ये ६७५ जण मृतावस्थेत सापडले होते.

गायब झालेल्यांपैकी मृतावस्थेत सापडलेल्या लोकांची कारणे:- 
  1. अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली असावी. 
  2. काहींनी पळून गेल्यावर स्वखुशीने आत्महत्या केली असावी
  3. नैराश्याने काहींनी आत्महत्या केली असावी
  4. काही अपघातात ठार झालेले असावेत. 
वरील आकडेवारी ही पोलीसांकडे नोंद झालेली आहे आणि म्हणूनच खरोखर "बेपत्ता" झालेल्यांची आकडेवारी जवळजवळ दुप्पटीने जास्त असण्याची शक्यता आहे.. ! 

अजून काय कारणे असावीत युवा पिढीने इतकी टोकाची भूमिका घेण्याची ?? 
इतक्या जास्त प्रमाणात घर सोडून जाण्यासाठी लोक का मजबूर होतात..??
कुटुंबात असलेली "नो केअरिंग अटिट्युड"..???
कि "ओव्हर प्रोटेक्टेड" वातावरणात सांभाळल्यामुळे आलेली स्वत:बद्दलची भीती?
लोकशाही देशात राहून हुकुमशाही पालकांनी स्वत:च मुलांवर लादलेल्या अतिमहत्वाकांक्षी अपेक्षा ?
आणि त्या अवास्तव अपेक्षा पूर्ण न करता आलेली, भीतीने घाबरलेली असंख्य मुले?
या डिप्रेशन मुळे १४ ते २० वयातील मुले मुली नको त्या मार्गाला लागलेली उदाहरणे आपण हताशपणे पहात आहोतच.. !  
आणि जे तरुण तरुणी या सगळ्या चुकीच्या स्पर्धात्मकतेला बळी पडत आहेत त्यांचे काय?
जर शहरात हि स्थिती असेल तर गाव खेड्यांमध्ये काय अवस्था असेल..?

...................